चार गझला : अझीझखान पठाण



१.

हे तुझे पाहून नेत्या थोर असणे
आवडे माझे मला मी चोर असणे.

मी पुढे पाहुन वळवले तोंड त्यांनी
फार माझे  टोचले सामोर असणे.

कौतुके व्हावी पिसाऱ्याचीच केवळ ?
एवढ्यासाठीच असते मोर असणे ??

कासऱ्याचा फास झाल्यावर कळाले
एवढे सोपे नसावे दोर असणे.

का कुणी सोडून गेले का तुलाही ?
का तुझे हे पावसा घनघोर असणे ?

संपवाया घोर... संपवणे स्वतःला
या परी वाईट नव्हते घोर असणे.

यातही माझाच का रे दोष मित्रा !!
या नकाशावर कुठे लाहोर असणे ?

मी उभे वैऱ्यास केले पाडल्यावर
दावले की काय असते 'जोर असणे

२.

जन्मभर सोबत कितीही चालल्या ठेचा
एवढ्या कोठे समंजस वागल्या ठेचा

मी स्वतःला सोडले नेऊन रस्त्यावर
स्वागतासाठी पुढे सरसावल्या ठेचा

खेळणी,पुस्तक,किराणा,औषधे,साडी
काढुनी सामोर सगळ्या ठेवल्या ठेचा

कोणती होती लिपी अन कोणती भाषा ?
काल बापाच्या कपाळी वाचल्या ठेचा

यायचा जेथे मला तो चंद्र भेटाया
ती जुनी पाहून पांदण लाजल्या ठेचा

सांत्वने उपरी कुणाची घेतली नाही
मी पुरेशा जीवनी सांभाळल्या ठेचा

(बातमी असते सुखाची हेडलाइनवर
पण कधी सांगा कुणी जर दावल्या ठेचा)

कोण म्हणतो वेदनेची बातमी नसते
आजही लाईव्ह त्यांनी दावल्या ठेचा

मी पुढे जाउन शहाणे मागचे केले
मग कुठे जाऊन त्यांनी टाळल्या ठेचा

३.

काढले नाही कुणी उकरून भांडण
याच मुद्याला करा पकडून भांडण !

'वेळ ही भांडायची नाही खरोखर'
ते असेही भांडले ठरवून भांडण 

तू सुगंधी माळते केसात गजरा
की फुलांचे लावते जाणून भांडण

वाढला दोघातला नक्की दुरावा
ते करत नाही अता हटकून भांडण ?

तारले होते मला त्याने कितीदा
काढतो याचेच तो खोदून भांडण?

"तू कधी केलाच नाही फोन तर मग"
"सांग कोणाशी करू निकरून भांडण ?"

तेवढे नसते कधी माझे कुणाशी 
पण स्वतःशी चालते आतून भांडण

फोन करतो...रोज रुसते ठेवताना
शेवटी शमते खरे भेटून भांडण

वाहिल्या त्याने शिव्या देऊन झप्पी
भेटलो जेव्हा जुने विसरून भांडण


४.

ऐकली नाही जराही गोष्ट माझी
केवढी रुतली तुलाही गोष्ट माझी

त्या तुझ्या पारायणाचा सार होती 
हो...! जरा नव्हती प्रवाही गोष्ट माझी

'मी' पणाचे गाळले संदर्भ सारे
मग कुठे पटली मलाही गोष्ट माझी

टाळले जेव्हा तिचे तपशील सगळे
फार आवडली तिलाही गोष्ट माझी

काल मेल्यावर चघळल्या फार गेली 
तोच मी अन तीच का ही गोष्ट माझी!

दुःख, हळहळ, सांत्वने खेरीज दुसऱ्या 
फार उपयोगात नाही गोष्ट माझी
.................................................

अझीझखान पठाण
गाळा टाईप ०५/१२/०१
विद्युत विहार केटीपीएस वसाहत
कोराडी, जिल्हा नागपूर. ४४४११११

1 comment:

  1. चारही रचना फारच सुंदर

    काल बापाच्या कपाळी वाचल्या ठेचा

    बापाचे दुःख समजून घेणारी ही द्विपदी फार सुंदर याच गझलेमध्ये लाईव्ह इंग्रजी शब्दांचा केलेला चपखल वापर सहजता दाखवतो

    पण स्वतःशी चालते आतून भांडण...👌

    मी पणाचे गाळले संदर्भ सारे
    मग कुठे पटली मलाही गोष्ट माझी
    मस्त

    ReplyDelete