चार गझला : वीरेंद्र बेडसे



१.
तिच्या स्पर्शामुळे येते तरतरशी शहा-याला.
विनाकारण नका देवू कुणी हे श्रेय वा-याला.

तुझी सौंदर्य महिमा की अघोरी मोहिनी होती,
किती लोटांगणे पडली तुझ्या एका इशा-याला.

तिच्या डोळ्यामधे जहरी गुलाबी बाण मायावी
बचावाची कुठे संधी मिळू देते बिचा-याला.

इथूनी निघ अता सुर्या तुझे तू तोंड कर काळे ;
तिला भेटेल जेव्हा मी नको कोणी पहा-याला.

तिने मज चुंबण्याआधी तिला मी बोललो एकच
कशाला ठेवते वेडे निखा-यावर निखा-याला..?

२.
उसवता धागा शिलाईचा
आठवावा हात आईचा.

मी तिच्या लेखी असा आहे
शुभ्र पानी डाग शाईचा.

वाचलो...जन्मून पायाळू
थोर हा उपकार दाईचा

नाव सांगा एक नमुन्याचे
कल कळाला ज्यास बाईचा.

निवडणुक येता निघे आता
वारसा पेटंट गाईचा.

सज्जनांच्या मारला माथी
जन्मभर ठेका भलाईचा.

३.
हा नको तो बरा.
ही जगाची त-हा.

यार माझा खरा
लोचनीचा झरा.

खेळ हा तर जुना
मी नवा मोहरा

काय आयुष्य हे...
मखमली पिंजरा.

घात करतो सदा,
देखणा चेहरा.

जीव वेडा खुळा
हावरा...बावरा.

हात सोडू कसा..?
ती नदी..मी  झरा.

४.
आतडे वाजे भुकेची बासरी अद्यापही.
हूल मजला देत आहे भाकरी अद्यापही.

टाय अन कोटात फिरतो छोकरा शहरामधे
फाटकी गावी पित्याची कोपरी अद्यापही

तो अयोध्येचा निकाली प्रश्न आता काढला..
राम हसला पण विव्हळते बाबरी अद्यापही.

चंद्र मंगळ मोहिमेच्या काय डिंग्या मारता-
याच देशी सून जळते सासरी अद्यापही .

ही दशा बदलेल याची एक अंतिम शाश्वती
पायरीने सोडली ना पायरी अद्यापही.
...........................................................

वीरेंद्र बेडसे



No comments:

Post a Comment