१.
सदैव येती आठवणींच्या लाटांवरती लाटा
जरी चुकवल्या जुन्यापुराण्या त्या मळलेल्या वाटा
स्त्री जातीच्या व्यथा वेदना दळणारे ते जाते
अश्रूंसोबत दुःख वाटतो वरवंटा अन् पाटा
मौन पाळले किती जरी तू नजर बोलते सखया
ये नजरेने बोलू आपण शब्दांना दे फाटा
दूरदूर तू गेला सजना तुझी आठवण येते
मला न कळले कधी गवसल्या अनुरागाच्या वाटा
आयुष्याने खूप शिकवले गझलेसाठी जगणे
त्या जखमांचा लाभ जाहला कधी न झाला घाटा
वाळवंट बघ झाले आहे आयुष्याचे 'मीना'
माझी सोबत करतो आता निवडुंगाचा काटा
२.
धरेच्या मीलना साठी जरी पाऊस कोसळतो
बिया रुजवायला जगवायला हमखास रिमझिमतो
कधी रिमझिम कधी धो धो तुझी बरसात होताना
सृजनतेचा किती सुंदर मला संदेश पाठवतो
चहा वाफाळलेला अन् भजी गरमा गरम खातो
असाही पावसाळा मी तिच्यासाठीच अनुभवतो
तुला घेऊन जातो बघ सदा पाऊस माहेरी
झुल्यावर तू झुलत असते मनाचा मोर नाचवतो
सरीवर सर पुन्हा आली पुन्हा भिजलो किती दोघे
कसा मी थंड राहू जर मला पाऊस पेटवतो
अशी हमखास देती दाद 'मीनाला' रसिक श्रोते
तिच्या गझलेतला पाऊस हृदयी शेर पोचवतो
...............................................
मीना शिंदे
दोन्ही गझला सुंदर
ReplyDeleteये नजरेने बोलू आपण...🌹👌
पाऊस पेटवतो !
व्वा