दोन गझला : शशिकांत कोळी

 

१. 

दोन्ही बाजूला दाराची कडी ठेवली 
येण्याचीही जाण्याचीही भिती ठेवली 

मी स्वप्नांचा केवळ साचा बनवत गेलो 
तिने रिकामी जागा आहे तशी ठेवली 

या साठी अश्रूंना केले जवळ जरासे 
अलवार तिने ओठांवर पापणी ठेवली 

येतो जातो ऋतू कुणास थांबत नाही 
प्रत्येक ऋतूला जखम नवी नवी ठेवली 

शहरा मध्ये निघुन आलो बघता बघता 
मागे चिंता आईसाठी घरी ठेवली 

धनुष्य म्हणजे कमान आहे त्या ओठांची 
मी बाणांची ओठांवर साखळी ठेवली 

२.

ही कशाची चालली वणवण इथे 
नेमके आलोय का आपण इथे ? 

हेच कळले कोण नसते आपले
आपले म्हणतात सारे 'जण' इथे

वाकडे पडलेच जर पाउल तुझे
मी पुन्हा ठरणार का 'कारण' इथे

पिंजरा सोडून जो गेला पुढे 
तो कुठे जगतोय पक्षीपण इथे

'जन्मही' अन 'देह' ही झाला तुझा 
हो तुझा झालोय मी कण-'कण' इथे
..................................

शशिकांत कोळी(शशी)...

No comments:

Post a Comment