तीन गझला : जयदीप विघ्ने

 
१.
 
मग भलेही जन्मभर तू तडफडू दे
एकदा कवडी नशीबा धड पडू दे

हासण्याचे मी दिले होते वचन पण
जर रडाया लागलो तर मग रडू दे

सोडना वाऱ्यावरी शंका तुझ्या तू
जे जसे आहे घडायाचे घडू दे

मी पुढे येतो तुझ्या होऊन नवखा
तू तुझीही नजर थोडी अवघडू दे

राहिलो बाकी किती अस्सल बघूया
एकदा हा देह सारा पाखडू दे


३.
प्रेम मिळवाया अघोरी रीत सांभाळू
वासनेचा गर्भ चिवडुन प्रेम धुंडाळू

मी विजेच्या शेपटीला बांधली ईच्छा
राख तर होणार होते स्वप्न पायाळू

पेटल्या धमन्या कुणाच्या गूढ स्पर्शाने 
सरकली साक्षात पायाखालची वाळू

यायला संशय नको होता तरी आला
ती अशी इतकी कधी नव्हतीच मायाळू

काय ह्या बहिऱ्यांपुढे मी बोंब ठोकावी
लागलो कानात माझ्या मीच किंचाळू


३.
 
ठणक ठणकेची कळू दे मला
काढ खपली भळभळू दे मला

ऐकना इतकी विनंती चिते
शांतचित्ताने जळू दे मला

नेम धर तो हक्क आहे तुझा
पण जरासे गाभळू दे मला

ही मिठी मृत्यूस कारण जरी
मान्य आहे आवळू दे मला

लंगड्या इच्छेस वाटायचे
एकदा दैवा पळू दे मला
.............................................

जयदिप विघ्ने
7972449691
 

1 comment: