दोन गझला : रोशन गजभिये


 
१.
मरणा तुझ्या दिशेने मी चाललो उपाशी.
बसले गिळायला रे आयुष्य हे अधाशी.

खांदे न चार मजला मिळणार जाणतो मी.
जुळतात लोक केवळ अधिकोष धारकाशी.

ही धावपळ अचानक बघ थांबली मधातच.
गेला  अता  बिचारा होता  बरा  मघाशी.

असते जराभऱ्याचे उसने शरीर अपुले.
का भांडतो तरीही माणूस माणसाशी?

पाऊल  आपले  हे थोडे  जपून  टाका.
मासा कधी न करतो मित्रत्व त्या गळाशी.

साऱ्या प्रलोभनांना मी दूर ठेवण्याचा,
केला करार आहे माझ्याच काळजाशी.

आक्रोश ऐकल्यावर, परतेल तो कदाचित.
येऊन  मय्यतीवर दे  हाक  तू  जराशी.

२.

आयुष्याची पिकली पाने गळू लागली
गतकाळाची किंमत आता कळू लागली

फार मनावर ओझे आहे असे वाटते
जाताना ती रस्त्यातच अडखळू लागली

रूप किती हे लोभसवाणे जरा सज्ज हो
त्याच्या नादी नैतिकता बघ ढळू लागली

कोण कुणाच्या कामी येतो जमान्यात या
हाका मारत बाग फुलांची जळू लागली

बेकाबू अन भ्रामक इच्छा भटकली जिथे
त्याच दिशेने काया माझी पळू लागली

ठिगळांचाही संचय नाही तनू झाकण्या
दैन्य असे की भाकर सुद्धा छळू लागली

स्वछ मनाचा माणुस आता कुठे राहिला?
याचमुळे तर मानवता ही मळू लागली
................................................

रोशन किसनराव गजभिये
अमरावती

No comments:

Post a Comment