१.
जगण्याची या पायाभरणी केली आहे
मी दुःखांशी हातमिळवणी केली आहे
पत्ता माझा कळू दिला नाहीच कधी मी
लाख सुखांनी मला विनवणी केली आहे
तिला म्हणे गुलकंद करावा वाटत आहे
साठवायला गुलाब, बरणी केली आहे
मला वापरा हवे तसे अन् फेका नंतर
इतकी साधी विचारसरणी केली आहे
चला ढगातच पिक काढूया आता आपण
आकाशाची मी नांगरणी केली आहे
कसा बरे विसरेन कधी मी तुला वेदने
हजार वेळा तुझी उजळणी केली आहे
कावळ्यास ती घरात घेते भाकर देते
गोष्टीमधली प्रेमळ चिमणी केली आहे
वाऱ्याच्या दिशेप्रमाणे रोजच भिरभिरणे आले
माझ्या वाट्याला कायम हे असे भटकणे आले
जे वाटतात अपुले ते नसतातच अपुले मित्रा
आता आताच मलाही दुनिया ओळखणे आले
प्रेमाचा रस्ता शेखर भलताच कठिण असतो हा
आठवणीमधे प्रियेच्या दिनरात हरवणे आले
यासाठी पतंग होउन मी उंच उडालो नाही
उडणे आले म्हटले की काट्यात अडकणे आले
प्रेमाचा रंग कधी ना माझ्यावर चढू दिला मी
प्रीती आली म्हटले की अश्रू ओघळणे आले
हे नशीब माझे झाले जणु मराठवाडा आता
दुष्काळ बारमाहीचा अन् स्वप्न करपणे आले
कण कण या पृथ्वीवरचा हा पेटवतो की काय?
सूर्य अता डोक्यावर माझ्या आदळतो की काय?
थकून आलो आहे मित्रा आधी काही पाज
तहान माझी तू शब्दांवर भागवतो की काय?
माझ्यासाठी दु:ख सुखांना घेउन येते रोज
खरेच मी दु:खाला इतका आवडतो की काय?
ती हसली तर हसायचे ना नुसता बघतो काय?
परत तुला संधी आलेली घालवतो की काय?
एकांताच्या मिठीत आहे निघून आलो दूर
पण दुनियेला माझा पत्ता सापडतो की काय?
शोधुन थकला पक्षी, नाही सापडले पण झाड
घरटे आता घरात माझ्या तो विणतो की काय?
काल अचानक दिसला माझ्या कपाटात उंदीर
माझ्या साऱ्या वह्या गझलच्या कुरतडतो की काय?
नाणे खणखण वाजत नाही शेखर खरेच सांग
खोटा शिक्का तू बाजारी चालवतो की काय?
..................................................
शेखर गिरी
No comments:
Post a Comment