१.
चंद्र तारे,बाग बगिचे,उंबरे टाळून पाहू,मांडले नाही कुणी जे,ते जरा मांडून पाहू...
रंग आधी मूळ त्याचा कोण जाणे काय होता?
गंजलेल्या चेह-याचे पोपडे नखलून पाहू...
कालचा गोंधळ बरा हे माहिती आहे तरी पण,
गाढवाला आज गीता चल पुन्हा सांगून पाहू...
क्षण मिठीचा रोज म्हणतो,जन्मभर बिलगून राहू,
अन् जुळे म्हणते सयामी,वेगळे होऊन पाहू....
टोमणे,धुसफुस,अबोला,डूख धरणे बास आता,
आज मैदानात उतरुन मोकळे भांडून पाहू....
नेमकी बेरीज हल्ली एकशे ऐंशी मिळेना,
या त्रिकोणाचे नव्याने कोन पडताळून पाहू..
स्फोट केल्यावर अणूंचा,ते म्हणाले बुद्ध हसला,
तोच म्हणतो बुद्ध आता,शांतता शोधून पाहू....
आटला नव्हता कधीही थेंब या डोळ्यातला,
एवढा पाऊस होता बारमाही आतला....
जीभ ओठांआड बाई ठेव कायमची तुझी,
सांगतो आहे नथीचा आकडा नाकातला.....
आजवर नव्हते कुणीही एवढे जपले मला,
बोलला हलकेच काटा शेवटी पायातला....
लावला मी जीव पण व्यवहार त्याने साधला,
आवळ देऊन नेला कोहळा हातातला....
लागते अलगद समाधी,मोक्ष वाटे लाभला,
तो जरा गुलकंद जेव्हा चाखतो ओठातला .....
ऐकतो एकाग्रतेने वाचताना तू गजल,
जीव अभिमन्यूप्रमाणे वागतो पोटातला.....
न्याय तुमचा ऐकण्याला थांबला आहे कुठे?
प्राण तर केव्हाच गेला कोवळ्या देहातला...
...................................................
माधुरी चव्हाण जोशी
देवगड
ReplyDeleteअन् जुळे म्हणते सयामी ...👌🌹