दोन गझला : आर के आठवले



















१.
जीवना मी तुला सोसले केवढे!
शांत सरणावरी वाटले केवढे !

आज नियती पुढे हारलो शेवटी
दैव माझ्यावरी हासले केवढे !

झोपडीच्या भुकेला पुरे भाकरी
तेच खात्या घरी चोचले केवढे !

घेतली झेप मी शेवटी जिंकलो
खेकड्यांना बघा बोचले केवढे

कैद हा देह पण मन तिथे राहिले
फूल शय्येवरी टोचले केवढे..!

रात्र गेली कशी काय सांगू तुला ..
गात्र धुंदावले; नाचले केवढे !....

टाळले का मला बोलण्याचे तिने ?
मात्र डोळे तिचे बोलले केवढे !

२.

पिंजरा हा बंगल्याचा सोडताही येत नाही !
कोंडमारा एवढा की सांगताही येत नाही !

राग येतो एवढा पण प्रेम बोलू देत नाही
भांडतो म्हटले तरी मग भांडताही येत नाही

तोलतो बुंधा किती फांद्यास मोठ्या तृप्ततेने
भार सारा पेलताना डोलताही येत नाही

एक सांगा चूक माझी एवढे मी बोललो अन्
मांडला पाढाच तुम्ही खोडताही येत नाही !

मुक्त नाही मन जिथे तो राजवाडा काय कामी
सुख असे जे लादलेले भोगताही येत नाही

चूक झाली की सदाही गोड हसते फार मग ती
राग होतो शांत तेव्हा टोकताही येत नाही

ओठ माझे ऐन वेळी का असे हे गोठलेले ?
ती उभी माझ्या पुढे पण बोलताही येत नाही
.......................................................... 

आर. के. आठवले,
औरंगाबाद
 

1 comment: