दोन गझला : विद्या देशमुख



१.

संपर्क साधणारी लाईन व्यस्त आहे
देवा कसा इथे हर माणूस त्रस्त आहे 

आहे अधांतरी या खोप्यात प्राण पक्षी
यम सारखा उशाशी घालीत गस्त आहे

खड्डय़ात जाइ निष्ठा खोटी ठरे प्रतिष्ठा
नेता हरेक अपुल्या मस्तीत मस्त आहे

येतात योजनाही जनतेस भुलवण्याला 
अनुदान कागदावर सर्वत्र फस्त आहे

रस्ते कसे म्हणावे खडतर प्रवास अवघा 
खड्ड्यात चालता .. झाले मरण स्वस्त आहे

सांगू कशी कहाणी माझ्याच संपण्याची
आघात काळजावर तो जबरदस्त आहे

२.
ठेव श्वासांवर जरा करडा पहारा 
वाढल्या आहे यमाच्या येरझारा

पोचले अवघेच जग एका स्थितीला 
झुंजतो आहे कसा हा श्वास पारा

वाढले आहे गवत हे जीवघेणे
सांग ना ठेवू कुठे उपटून भारा

शांतता घोंगावते बघ ..अंतरीची 
उघडते आहे मनांच्या बंद दारा

साथ आहे जीवघेणी ऐक ना रे 
घे जरा घरट्यात अपुल्या तू निवारा

ज्ञात झाले माणसाला मौन अश्रू
होत होता पिंजऱ्याचा कोंडमारा

पाहवेना साहवेना वेदना ती ..
दूर तुटतो कळवळुन तो एक तारा 

 ..................................
 
विद्या देशमुख


                                 

No comments:

Post a Comment