दोन गझला: प्रमोद राठोड


 

ईश्वराला कोण...'कैवारी' समजतो ?.
जन्म देणाऱ्यास मी 'भारी' समजतो

नम्रता मजला मिळाली वारश्याने
तू कशाला यास 'लाचारी' समजतो

वेदना वेळेत येते रोज दारी
मी सुखांची हीच 'गद्दारी' समजतो

आज तू किंचाळणे म्हणतोस ज्याला
मी उद्याची त्यास 'ललकारी' समजतो

वाटते स्त्री ज्या कुणाला भोगवस्तू
मी अशा मेंदूस 'आजारी' समजतो

ज्या मुलांनी राखला आदर मुलींचा 
त्या मुलांचा बाप 'संस्कारी' समजतो

लपवितो पोरी तुझ्या लग्नात अश्रू
हीच बापाची 'अदाकारी' समजतो

ती फुलांच्या सारखी दिसते म्हणूनच
मी फुले विकणे गुन्हेगारी समजतो 

२.

ध्येय डोळ्यापुढे ठेवले पाहिजे
पाय थकले तरी चालले पाहिजे

वार हृदयावरी कर असा एकदा
आरश्याचे तडे लाजले पाहिजे

रूप मेणाप्रणाने मिळाले तुला
तू उन्हाला इथे टाळले पाहिजे

प्राण शस्त्राविना पाहिजे जर तुला
ओठ ओठांवरी ठेवले पाहिजे

गोडवा प्रेम वात्सल्य शहरात या
गावखेड्याकडुन,आणले पाहिजे

जन्म घेताच कन्या घरी आपल्या
चंद्र तारे फिके वाटले पाहिजे

वेदनाही तुला गोड वाटेल पण
वार मित्रांकडुन जाहले पाहिजे
...............................................

प्रमोद राठोड
(नाशिक )

1 comment:

  1. दोन्ही गझला सुंदर

    ज्या मुलांनी राखला आदर मुलींचा ... मस्त

    ReplyDelete