दोन गझला : रजनी निकाळजे

 

१.

उघडे होते उघडे आहे दार मनाचे
तुझ्याचसाठी सजले रे आवार मनाचे‌...

हवे तसे मी मना सारखे  वागत गेले
पुरवत गेले लाड चोचले फार मनाचे...

मनात माझ्या दडले आहे पुष्कळ काही
बंद ठेवले कायम  कोषागार मनाचे....

लिहिते कविता दोहा आणिक अभंगवाणी
तरी कळेना कोणालाही सार मनाचे.....

मी देहाच्या चिपळ्या केल्या वाजत गेले
दिसून आले भजनी जे संस्कार मनाचे...

तुझी आठवण मनास माझ्या छळून जाते
काय करू मी सांग अता बेकार मनाचे.....

सांज बावरी रजनीगंधा उजळत आली
किती रूपडे खुलले या गुलजार मनाचे...

२.

लिहित राहते थांबत नाही
दाद कुणाला मागत नाही

लेखणीस मी दैवत केले
व्यर्थ कुठे मी वाकत नाही

ऐकत आले रामायण मी
मौन पाळते बोलत नाही

हळूच घेते उंच भरारी
विसंबून मी राहत नाही

गर्व सश्याचा खाली झाला
कासव शर्यत हारत नाही

काटेरी त्या वाटा मधून
पुढे चालते थांबत नाही
........................................

रजनी निकाळजे

1 comment:

  1. मी देहाच्या चिपळ्या केल्या

    कित्ती सुंदर

    ReplyDelete