१.
तुझ्याविना या टपटपणाऱ्या आभाळाचे काय करू मी...?
भिजण्यासाठी आसुसलेल्या शृंगाराचे काय करू मी...?
अंतरातल्या डोहामध्ये खोल बुडवली व्यथा बोलकी
डोळ्यामध्ये तरंगणाऱ्या कारुण्याचे काय करू मी..?
बहरुन येता काळ मृगाचा दूर पांगला मेघ जलाचा
अवकाळी मग झोडपणाऱ्या पर्जन्याचे काय करू मी...?
मान्यवरांच्या बैठकीतली दुर्लक्षित मी..जागृत नारी
उपहासाने वेष्टित दुबळ्या सत्काराचे काय करू मी...?
उंच छताने जरी झेलल्या कोसळणाऱ्या पाउसधारा
भिंतीमधुनी पाझरणाऱ्या ओलाव्याचे काय करू मी...?
वैऱ्याशीही औदार्याने करार केला एकजुटीचा
प्रेमासंगे फिसकटलेल्या व्यवहाराचे काय करू मी..?
मंत्र शिवाचा...अखंड जपुनी मन बेलाचे पान जाहले
डोळ्यामधुनी सतत वाहत्या अभिषेकाचे काय करू मी...?
२.
टाळलेस तू मला...त्यात काय एवढे
श्वास एक थांबला...त्यात काय एवढे
व्यर्थ उडवलीस तू..धूळ सोवळ्यावरी
देवही..विटाळला त्यात काय एवढे
गुंतवून ठेवणे...झेपले मला कुठे
साधली तुला कला...त्यात काय एवढे
आसवे पिऊन ना..भागली तहान ती
पिळुन देह काढला ...त्यात काय एवढे
दातओठ खाउनी ओढलास पाय तू
मीच नाद सोडला ..त्यात काय एवढे
काढलीस एक तू वीट पायथ्यातली
कळस वर दुभंगला ..त्यात काय एवढे
खेळ होउनी तुझा...मी हरायचे म्हणे
घे ठराव मांडला...त्यात काय एवढे
.........................................
डॉ .स्नेहल कुलकर्णी
दोन्ही गझल खूपच सुंदर...
ReplyDeleteदोन्ही गझला सुंदर
ReplyDeleteकाय करू मी ...👌🌹