१.
कधी हारली ना सुखाशी लढाई
घरंदाज माझी व्यथा पेशवाई
मला वाटते ती जरा द्वाड आहे!
तुझी आठवण वागते मोगलाई
तुला ओढ असते सतत चाखण्याची
जणू दोन ओठात असते मिठाई
किती पोचती काळजाच्या तळाशी
कसे शेर लुटतात ना वाहवाई
तुझा गंध स्पर्शुन जाता मनाला
उभा देह डोले जणू आमराई
उभा जन्म तू माय झालास माझी
विठोबा तुझ्या आत आहे विठाई
२.
कसे पेलून घ्यावे भावनांच्या या उमाळ्यांना!तसा नसतो किनाराही मनाच्या उंच लाटांना!
जरा उघडून सवन्यांना उजेडाला पुन्हा झिरपू!
तिमीराची बुजव खोली अता उजळून तेजांना!
असावी कैक गोदामे, मनाच्या खोल जागांची!
नको आहे उघड काही, करू दे बंद बळदांना!
मनाला रानव्याचे भय किती खोटे हसावे मी!
व्यथेची हाकमारी जागवी बेजार शब्दांना!
विसरला मार्ग परतीचा भटकतो जीव एकाकी!
कसे हरवायचे सांगा अशा या गूढ चकव्यांना?
..............................
शुभदा कुलकर्णी 'मिश्री'
No comments:
Post a Comment