१.
सोडून एकट्याला जे ते निघून गेले !
आयुष्य यातनांचे येथे जगून गेले !!
आता नकोस शोधू डोळ्यात स्वप्न माझ्या ;
ओघात आसवांच्या सारे मिटून गेले !!
आला कधी सुखाचा माझ्या वसंत दारी ;
हातात शब्द उरले , बाकी भिजून गेले !
एकेक भिंत आहे रचतो पुन्हा नव्याने ;
बेभान वादळाने घरटे तुटून गेले !!
वाटेत "जीवनाच्या" आले बरेच काटे ;
काही गळून गेले , काही छळून गेले !!
माणूस ना कुठेही, आहेत धर्म सारे !
कसल्या परंपरेचे हे वाहतात वारे ??
रजईतल्या सुखाची घेतोस झोप तू अन् ;
काळोख पांघरोनी निजतात लाख तारे !!
ती लाट सागराची येते , निघून जाते ;
आतूरले कधीचे मिलनास ते किनारे !!
तू ऊब शोधताना गेलीस दूर कोठे ?
का पाहिलेच नाही हृदयातले निखारे ??
मी सांगतो इथेही होणार न्याय नाही ;
आहे कुठे तराजू सुख-दुःख तोलणारे ?
तुझ्या-माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे
तरी पाऊलवाटेच्या खुणा सांभाळतो आहे
तुझ्या त्या दूर जाण्याने, जरा आलोय भानावर;
अता थोडा मला माझा सुगावा लागतो आहे
तुझ्यावर प्रेम करण्याची कबूली काय मी देऊ ?
तसा प्रत्येक मिसर्याशी पुरावा सोडतो आहे
जिथे झाली तुझी माझी कधीही भेट एखादी
पुन्हा तेथून जाताना जरासा थांबतो आहे
किती झाले जमा माझ्या मनाशी थेंब दुःखाचे ?
जरासे पाळतो आहे , जरासे ढाळतो आहे
असे म्हणतात की उरते फिकटशी रेष नात्याची;
जुन्या नात्यातले धागे नव्याने शोधतो आहे
तसा नाही गुन्हा काही तुझ्या माझ्या नशीबाचा ;
कुणाला दोष का देवू ? स्वत:शी भांडतो आहे
.........................................
जीवन ताम्हणे 'कविकुमार'
तीनही गझला सुदंर 👌👌 अभिनंदन💐💐
ReplyDelete👌🌹
ReplyDelete