१.
कोण जाणे? कोण कुठली? काय मागत?
आठवण येईल बहुदा न्याय मागत!
बोळवण केली पिठाचे दूध पाजुन
आर्जवे करतेय जनता साय मागत
शेत विकले; चैन केली, माज केला!
शेवटी दिसला बिचारा हाय "मागत"
बाप असतो बाप; मर्यादाच त्याला!
लेकरू रडणार अंती माय मागत!
जीवनाशी झुंजला घेऊन कुबड्या
तो कधी दिसलाच नाही पाय मागत!
२.
हात केलेलेत त्यांनी वर
चल स्वतःला आत्मनिर्भर कर
सोडले आहेस वाऱ्यावर
अन तुला म्हणवायचे ईश्वर
कासवाच्यासारखे होऊ
कासवाची भिस्त पाठीवर
ती मुक्याने रात्र गेलेली
बोलली ओठांतली थरथर
चालला आहेस कोठे तू?
केस तर आधी तुझे विंचर!
जन्मकोडे फार गुंत्याचे
पण जरा डोके तरी वापर!
बाभळीचे झाड आहे मी
मी तुझ्या असणार बांधावर
फक्त सेल्फी काढले सोबत
चारली नाही कुणी भाकर
दीड दमडी राहिली शिल्लक
शेत विकले दीडशे एकर!
वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटत गेलो आपण
वेगवेगळ्या रंगांनी मग बाटत गेलो आपण
दर्ग्यामध्ये, मंदिरातही किती खेळलो तेव्हा
आता मग का अपुले रस्ते छाटत गेलो आपण?
धूर्त जगाने उगी लावली तुझी नि माझी स्पर्धा
उगी एकमेकांच्या दोऱ्या काटत गेलो आपण
दुःख, वेदना उरात ठेऊन जगायला ही शिकलो
घुसमट झाली आणिक नंतर फाटत गेलो आपण
धर्माच्या नावे बरबटला समाज तेंव्हा, आता
युगे युगे का अशी दुकाने थाटत गेलो आपण?
आणि अचानक पुन्हा भेटलो, पुन्हा हरवलो दोघे
कसे आपसुक डोळ्यांमध्ये दाटत गेलो आपण?
.................................
प्रशांत पोरे
❤❤
ReplyDelete