१
घेते आकाशात भरारी एक पाखरू,
स्वप्ने बघते आकाशाची एक पाखरू.
रंग बिरंगी स्वप्नांमध्ये झुलू लागले,
तिच्या मनाच्या फांदीवरती एक पाखरू.
झाड होउनी फांदी फांदी होते माझी,
बसते जेव्हा खांद्यावरती एक पाखरू.
उडण्यासाठी पंख फडफडत होते त्याचे,
अपंग होते जन्मतः जरी एक पाखरू.
संध्याकाळी रडता रडता नदी म्हणाली,
आले नाही काठावरती एक पाखरू.
जाळ्यामध्ये तडफडणारी बघून पक्षिण,
करू लागले आई आई एक पाखरू.
२.
जर व्हायचे मला तर होईन पंख त्याचे,
रक्तात माखलेल्या घायाळ पाखराचे.
दारावरून चकरा मारू नकोस दुःखा,
पाहून दार तुजला किंचाळते घराचे.
ता-या समान माझ्या तुटतात रोज ईच्छा,
काचे समान तुकडे होतात काळजाचे.
थांबून लाट गेली झाला सुना किनारा,
होते असेच काही प्रेमात सागराचे.
बागेपुढेच बसतो तो फूल हारवाला,
दररोज लक्ष जाते कात्रीवरी फुलाचे.
डोळ्यात येत नाही का थेंबही ढगाच्या,
आशाळभूत डोळे पाहून अंकुराचे.
३.
दिसतो तुझा झोपेत झोपाळा मला,
ये एकदा भेटून जा बाळा मला.
त्या वाळलेल्या जीर्ण वृक्षासारखी,
गावातली माझी दिसे शाळा मला.
आयुष्य माझे बंद ग्रंथासारखे,
उघडा कुणी कोणीतरी चाळा मला.
मी राहिलो होतो भरोश्यावर तुझ्या,
तू फसविले आहेस आभाळा मला.
मन पारदर्शक काच असल्यासारखे,
भरपूर सांभाळून हाताळा मला.
तिरडीवरी काही नको आहे मला,
बस पाच शेरांची हवी माळा मला.
४.
विव्हळत होते वेदनेत त्या पक्ष्यांवरती काय लिहू,
आरपार चिरुनी जाणा-या बाणांवरती काय लिहू.
खूप लांबचा होता रस्ता रस्त्यावरती काय लिहू,
चालुन रक्ताने भरलेल्या पायांवरती काय लिहू.
आजही तिची खुणवत आहे थकलेली झोपडी मला,
आणखीन त्या म्हातारीच्या दुःखांवरती काय लिहू.
जो येतो तो सुरा घोपतो लावत नाही मलम कुणी,
पाठीवरल्या नाभरणा-या जखमांवरती काय लिहू.
शाळा सुटली हात चिमुकले करू लागले कष्ट पुढे,
इवल्याश्या त्या हातांवरच्या फोडांवरती काय लिहू.
...............................................
अविनाश येलकर
घुसर, ता.जि. अकोला
8698209390
जो येतो तो सुरा घोपतो...
ReplyDeleteघोपतो...👌