पाच गझला : संतोष कांबळे

 


 

 

 

 

 

 

 

 

 

१.

चूक होते या जमाखर्चामधे हमखास हल्ली-
का दिल्या अन् घेतल्याची नोंद देते त्रास हल्ली?

टाकला होता सहज शेंदूर ज्यावर एकदा मी,
तो दगड यात्रेकरूंच्या पावतो नवसास हल्ली-

आर्त हाका पोचल्या नाही तुझ्यापर्यंत माझ्या-
का असे हे लावले आहे कुलुप दारास हल्ली?

आठवांची एकही ठिणगी नका टाकू कुणीही-
आत माझ्या मिणमिणाया लागते अारास हल्ली-

या जगाच्या मतलबी नात्यातला व्यवहार कळला-
आवडाया लागला माझा मला सहवास हल्ली-

२.
वास्तवापेक्षा जुन्या गोष्टीमधे तो ठीक आहे
कालचा लाकूडतोड्या फार प्रामाणीक आहे-

देवळापेक्षा तुला जो माणसामध्ये पहातो-
तो तुझी वारी न करणारा कुणी आस्तीक आहे-

आतली ठसठस कधी बाहेर भळभळलीच नाही-
घाव माझ्या काळजाचा केवढा सोशीक आहे-

रोखली अाहे नजर त्या पायरीवर सारखी का?
विठ्ठला त्या पायरीशी का तुझी जवळीक आहे?

कोणत्या जन्मात माझा हात ती घेईल हाती?
हीच तर जन्मा तुझ्याशी जन्मभर झिकझीक आहे-

३.
वारी नसली तरी अंतरी तोच जिव्हाळा आहे..
लेकुरवाळा होता विठ्ठल;लेकुरवाळा आहे..

प्रश्न मला पडतो कायम पाऊस सुरू झाला की;
कोण कालच्या अाठवणींना देत उजाळा आहे?

तप्त उन्हाळ्यासाठीही तो फुले अंथरू शकतो..
गुलमोहर म्हणतो,"फुलण्याचा ऋतू उन्हाळा आहे !"

गोरा असता तर कोणीही पळवुन नेला असता..
बरेच झाले;तुझा रुक्मिणी विठ्ठल काळा आहे !

मी अात्म्याची दुकानदारी कधीच केली नाही..
म्हणून तुमच्यापेक्षा माझा भाव निराळा आहे..

 

४.

तुला मी पाहिजे होतो तुझ्या बुजगावण्यासाठी..
मला मी सिद्ध केले संकटे हुसकावण्यासाठी..

उभा अंधार चिरणार्‍या दिव्याचा वंश आहे मी..
उजळलो मी तुझी फुंकर भिकेला लावण्यासाठी..

रुजायाचे ठरवले तर खडकही फोडता येतो..
बियांना मार्ग सापडतो मुळे फैलावण्यासाठी..

गरूडाच्या फुशारीवर पिले जगतील का नुसती?
नभाची ओढ पंखांना हवी झेपावण्यासाठी..

ठसे तू जन्मभर तिथले पुसू शकशील का अाता?
जिथे मी ओठ वापरले तुला उष्टावण्यासाठी..

दगड झालोच तर होईन जात्याच्या तळीचा मी..
नको शेंदूर अंगावर जगाला पावण्यासाठी..

५.
नका आठवांनो,नका वाजवू काळजाची कडी..
अताशा कुठे खोल वण पांघरू लागले कातडी..

उभा देह माझा जरी घट्ट धातूमधे घडविला..
तरी आतला जीव अद्याप मी ठेवला लाकडी..

तुझ्या पौर्णिमांची नको दाखवू अामिषे तू मला..
अरे मोडली मी नव्या मखमली चांदण्याची घडी..

दिवेलागणीला उजळले दिव्यासारखे चेहरे.. 
महालाहुनी साजरी वाटली मग मला झोपडी..

जरी जन्म अवघा पसारा जमवण्यामधे संपतो..
रिकामी तरी राहते शेवटी आपली पोतडी..
................................

संतोष विठ्ठलराव कांबळे
मु.पो.वडेल,
ता.मालेगाव, जि.नाशिक

No comments:

Post a Comment