१.
किती करू मी सारखी तडजोड आयुष्या ?
कधी तरी तू आपला हट सोड आयुष्या !
हवी कुणाला सांत्वना अन थाप पाठीवर ?
जरा खुशीने बोल तू पण गोड आयुष्या !
नजाकतीचा शेर सुचला..ऐकना मित्रा..
खुशाल मग तू मैफिलीला सोड आयुष्या !
पुरे अता हे कुढत जगणे सांग दुःखाला
सुखा समाधानात नाती जोड आयुष्या !
हवी हवीशी ठणक वाटे जिंदगानीची
उगा कशाला फोडतो तू 'फोड' आयुष्या ?
तिथेच सारे क्षण सुखाचे राहिले मागे
कशी तुझी ही नेहमी धरसोड आयुष्या !
२.
जगतो असा जसा मी हसरेच प्रेत आहे
आयुष्य सोडले तर बाकी मजेत आहे
मी झिंगतो सुखाच्या नुसत्याच कल्पनेने
अन दुःख भोगताना 'ती' ही नशेत आहे
चालून भक्त मेला वारीत विठ्ठलाच्या
दारात मंदिराच्या धोंडा पुजेत आहे
अंधार पोसताना ज्यांच्या पिढया गुजरल्या
सूर्यास झाकण्याचा त्यांचाच बेत आहे
आहे अजून माझी पकडून नाळ माती
उडतात तेच येथे जे जे हवेत आहे
कैफात वेदनेच्या केलेत रिक्त प्याले
मनसोक्त जिंदगीचा मी घोट घेत आहे
मरणामुळे अता तू होऊ नकोस दुःखी
सरणात देह जळतो आत्मा सचेत आहे
३.
वाढतो आहे मनाचा कोंडमारा सारखा
पोसतो देहात माझ्या मी निखारा सारखा
धग अशी या काळजाची दिसत असते का कधी
झेलतो लाखो विजांचा रोज मारा सारखा
लाट येते लाट जाते सागराची ही जरी
कोरडेपण सोसताहे हा किनारा सारखा
लाखदा समजावुनी ही ऐकले नाही कुणी
देत होता तू निसर्गा..जो इशारा सारखा
काय ऐसी चूक झाली माणसाच्या हातुनी ?
निसटतो आहे सुखाचा रोज पारा सारखा
४.
फार काही राहिले नाही घरी सांगायला !
कारणे शोधू नवी आपण पुन्हा भेटायला !
भेटल्यावर तू मला देवास मागू काय मी ?
राहिले नाहीच काही आणखी मागायला !
नाव होते त्यात माझे म्हणुन मी हसलो जरा
लाजली माझ्या पुढे मग ती उखाणा घ्यायला !
सावल्यांचा भार का होतो कधी मातीस ह्या ?
झेलुनी बिनधास्त घे तू उन्हे चमकायला !
आतल्या माझ्या मनाचे पाहिले शहरीकरण
अन सुखाचे गाव शोधू लागलो भटकायला !
रोजचे मरणे कधी संपेल का रे.. जीवना ?
प्रश्न हा साधा तरी अवघड असे सोडायला !
.................................................
महेन महाजन
आयुष्या ... भावली
ReplyDeleteचालून भक्त मेला वारीत विठ्ठलाच्या...👌
देवास मागु काय मी...🦚
देवास काय मागू 👌👌👌👌👌
Deleteदेवास काय मागू 👌👌👌👌👌
Delete