१.
फुलेन की कधीतरी जरी अता उदास मी
असेन शेवटी इथे तुझ्याच आसपास मी
तुझ्यासभोवती कधी हसेन त्या फुलातुनी
तुला म्हणून सांगतो, पुन्हा दिसेन खास मी!
कळून तू कधी मला जरी फुले न वाहिली
कळून घ्यायचा तुला करेन पण प्रयास मी!
कुणी न पाहिले असे इथे टपोर फूल हे
जपून ठेवले पहा.. कळू दिले कुणास मी?
विरून आसमंति या विरून जायचे मला
पटेलसा तुला असा उरेन एक भास मी
कुठे न जायचे मला, इथेच सर्व भेटले
मनामनात नांदतो असा मधुर सुवास मी!
२.
तसा छोटाच पॅराग्राफ आहे मी
असू द्या.. एक छोटा विषय आहे मी
न सांडावे कुठेही रक्त किंचितसे
असा हळुवार रेशिमवार आहे मी
तुला वाटे कसा मी सांग, वारा की
न दिसणारा हवेचा दाब आहे मी?
कधी रोखून धरतो तो भितीने की
कठिणसा सोडलेला श्वास आहे मी?
बरे झाले तुम्ही आलात मदतीला
इथे खोलात बुडला पाय आहे मी
तशी आलीच जर का वेळ माझ्यावर
तुझ्या पानांमधे लपणार आहे मी
कुठे रेंगाळतो कोलाहलामध्ये
मनीच्या घुंगुरांचा नाद आहे मी
कसा झुंजू खवळत्या या प्रवाहाशी
भरुन आल्या नदीचा काठ आहे मी
कुणाच्या देवळाशी तू उभी आहे?
तुझा का विसरलेला हार आहे मी?
३.
जोशात आत माझ्या घुसले कुठून पाणी
त्याला तरी कळेना वाहून काय न्यावे
ही आजची शिदोरी पुरवून वापरावी
जे कालचे टिकाऊ त्याला न विस्मरावे
समजावता न आले माझ्या सवंगड्यांना
आता कुणाकुणाला समजावुनी पहावे
केलेस काय तू त्या नाराज सोबत्यांचे
गोत्यात येत त्यांनी का नेहमी फुटावे?
साधीच माणसे जेव्हा बोलतात साधे
समजू नका तुम्हाला कळतात बारकावे
४.
मी तुझ्या शोधात नाही की तुझ्या स्वप्नात नाही
एकटा मी चंद्र असला जो पु-या विश्वात नाही
एवढा मी चाललो की पाय माझे कापताना
एक सांगा भव्य हा रस्ता कुठेही जात नाही?
कोण जाणे घेतलेला मी कधी हा वीषप्याला
वीषही ना बाधते पण हे कसे लक्षात नाही?
एकटे सारेच येथे एकट्याने झुंजणारे
एक साधा सोबतीला का कुणाचा हात नाही
भेटल्यावर त्या फुलांचे छान केले बारसे मी
गंध ज्यांचा लोपलेल्या या तुझ्या गावात नाही
५.
मी असे भिंग ज्याची काच तू
मी अशी आग ज्याची आच तू
भोवर्यांची मुळी नाही भिती
तूच हे संथ पाणी.. साच तू
अंगणाची कशाला साक्ष ती
मनभरूनी इथेही नाच तू
सोडवेना कधीचे हे जुने
प्रश्न माझेच ज्यांचा काच तू
..आणि किल्ली कशाला शोधतो
मी असे कुलुप ज्याची खाच तू
घोळ झाला जरा अर्थात पण
वेगळी ओळ नक्की वाच तू
...................................
विजयानंद दामोदर जोशी.
'शुभेच्छा', श्रीनगर, नाचणे बस स्टाॅपजवळ, नाचणे- रत्नागिरी.
पिन- 415612.
पाचही गझला अप्रतिम सर.. मनापासून आवडल्या. हार्दिक अभिनंदन💐💐
ReplyDelete