दोन गझला : संगीता म्हसकर



१.

पुन्हा एकदा भेटू आपण होऊ कातर..
पुन्हा एकदा जुन्या क्षणांना नवीन झालर..

पुन्हा एकदा वचने देऊ शपथा घेऊ..
पुन्हा एकदा वाहत जाइल हळवी घागर..

पुन्हा एकदा वाटेवरती ऊनसावली..
पुन्हा एकदा काजळकाठी  निवांत पाझर..

पुन्हा एकदा वळून मागे बघण्यासाठी..
पुन्हा एकदा डोळ्यांमधला श्रावण आवर..

पुन्हा एकदा सुख दुःखाची मैफल सजवू..
पुन्हा एकदा तुझीच गाणी तुलाच सादर..

२.

बोलका एकांत झाला बोलके काहूर झाले
सोबतीला राहिलेल्या आसवांचे सूर झाले

काय सांगावी कुणाला जीवनाची मी कहाणी
उसळल्या लाटा अनावर अन् किनारे दूर झाले

बोलण्यासाठी तुझ्याशी मार्ग जेव्हा शोधला मी
हे निळे आभाळ चिठ्ठी चांदणे मजकूर झाले

सांगता झाली कुठे अद्याप माझ्या मैफिलीची
वाहवा होते व्यथेची हुंदके मशहूर झाले..

माणसांनी व्यापलेल्या या तुझ्या शहरात आता..
सापडेना चेहरा मज मुखवटे भरपूर झाले..
.........................................

डॉ.संगीता म्हसकर

2 comments: