तीन गझला : अमोल शिरसाट

 


१.

बोलली ती कुठे काय झाले पुढे
बंद केले तिने फक्त डोळे पुढे

राहिले जन्मभर एक कोडे पुढे
ऐनवेळी कसे मौन आले पुढे

वाद,संवाद, विश्वासही संपला
राहिले पांगळे एक नाते पुढे

वाट अंधूकशी... गर्द झाले धुके
फार छळते भिती काय आहे पुढे?

साथ जर देत आहे तुझे मन तुला
मग नको तू बघू फार मागेपुढे!

एकदा आपला ठाम निश्चय करू
काय होईल ते पाहु पुढचे पुढे!

पाय थकतात हे का तुझे नेहमी?  
मन तुझे फार वेगात जाते पुढे

लेकरू आज गेले उपाशी पुन्हा
घुटमळे मायचा जीव शाळेपुढे...

 २.
कुणाला मोह माया क्रोध मत्सर टाळणे जमले
स्वतःला जिंकणे कोणास बुद्धासारखे जमले

करावे वाटले पण फार नाही वेगळे जमले
निवडला तोच रस्ता वेगळे जगणे कुठे जमले

सुखाने मग जगायाचा मलाही मार्ग सापडला 
बदलणाऱ्या ऋतूंसोबत बदल स्वीकारणे जमले

विरोधक एकमेकांचे किती खुर्चीपुढे नमले
कसे एका ठिकाणी हे विळे अन् भोपळे जमले

उपाशी वाडग्याने पाहिली जेव्हा शिळी भाकर
जिभा काढून मग एका ठिकाणी आतडे जमले

विदूषक वाटतो मी जीवनाच्या सर्कशीमधला
हसू खोटे मलाही चेहऱ्यावर लावणे जमले

मुलांनो दोष जाताना तरी देऊ नका काही
करत मी राहिलो आयुष्यभर मज जेवढे जमले
 
३.
सर्वही होते जरी उमजत तिला
मान्य होती आपली फसगत तिला

आत डोकावून कोठे पाहिले?
राहिला नवरा तिचा मिरवत तिला

बोटभर हासायची होती मुभा
चार भिंती नेहमी रडवत तिला

बाप नवरा आणि नंतर पोरगा
आजही नाही कुणी मोजत तिला

जेवताना घास अडतो नेहमी
पोरगी नाही कधी विसरत तिला

नातवांनाही अडाणी वाटते
जो तो* असतो नेहमी शिकवत तिला

जीवघेणा त्रास नात्यांनी दिला
एकटे नाही तरी जगवत तिला

पाहिजे ते भेटले नाही कधी
राहिले आयुष्यही चकवत तिला 

(*उच्चारी वजनाचा वापर)
..................................................... 

अमोल शिरसाट
मिलिंद विद्यालय,
कमला नगर, वाशिम रोड,
अकोला
४४४००२
संपर्क - ९०४९०११२३४

1 comment:

  1. तिन्ही गझला अप्रतिम

    स्त्री-जीवनावर भाष्य करणारी गझल विशेष भावली.

    ReplyDelete