दोन गझला : उमा पाटील












१.

सर्वांसोबत असूनही मी कुणाबरोबर नसते
मी नसल्याने वा असल्याने कधी कुणाचे अडते

दिसते आहे साऱ्यांनाही फक्त फुलाचे फुलणे
पण भवतीच्या त्या काट्यांचे दुःख कुणाला कळते

अता जराही मला उद्याची चिंता उरली नाही 
दुःखी असुनी आनंदाने दुःख लपवणे जमते

तू नसल्यावर वेळ कधीही माझा जातच नाही
सोबत असतो दोघे तेव्हा घटिका भरभर सरते

या दुनियेला कशाकशाचे व्यसन लागले आहे
आणि 'उमा' तर तुझ्या नशील्या डोळ्यांमध्ये बुडते

 २.

जाणून घेतले मी हृदयातल्या व्यथांना
जपले म्हणून कायम कोमेजल्या फुलांना

तिमिरातुनी यशाची शोधून वाट देती
आणेल का कुणी त्या पकडून काजव्यांना ?

सोडून पावसाळा, गेला जरी भुईला
ती तर जपून आहे, थेंबांत आठवांना

विश्वास मनगटावर आहे मला स्वतःच्या
दे! द्यायचे तुला तर, भाग्यात संकटांना

धुंदीत आज मीही, धुंदीत आज तूही
अडवू नकोस आता या मुक्त स्पंदनांना
...........................................

उमा पाटील


1 comment: