दोन गझला : सौ. दिपाली कुळकर्णी


 
१. 

वादळ मनातले जर थांबायला हवे
भेटून एकवेळा बोलायला हवे

प्रत्येक मानवाचा होईल बुद्धही
आतील युद्ध सारे जिंकायला हवे

होतील भांडणेही दोघात लाखदा
प्रेमात पण मनाने वितळायला हवे

इतकेच सांजवेळी हृदयास वाटते
घरट्यात पाखरांनी परतायला हवे

रेखाटल्यात सार्‍या शब्दांत भावना
प्रत्येक पान त्याने वाचायला हवे

२.

 वाट ही आहे भयंकर
अन् तुझ्या-माझ्यात अंतर

हासणारा मुखवटा पण
वेदनेचे आत अस्तर

आजही सांभाळते मी 
आठवांचे एक दप्तर

ध्येय आहे दूरवर पण
थांबणे नाहीच क्षणभर

नेहमी माघार माझी
चूक मी अन्..तू बरोबर

माणसांच्या चेहर्‍यांना
रोज वाचावे अवांतर

हात घे..हातात माझा
एकटा जाशील कुठवर ?
....................................

साै दिपाली कुलकर्णी

2 comments:

  1. दोन्ही गझला सुंदर.. लाघवी👌👌

    ReplyDelete
  2. दोन्ही गझला सुंदर.

    आतील युद्ध सारे जिंकायला हवे...🌹👌

    माणसांच्या चेहऱ्यांना
    रोज वाचावे अवांतर ...👌

    ReplyDelete