पाच गझला : सिद्धार्थ भगत

 

१.

झालो स्वतःला पारखा देशात मी
पोचू कसा माझ्या अता गावात मी 

त्यांनीच माझ्याशी दगा केला असा 
आयुष्य सारे ओतले ज्यांच्यात मी
 
नाही पुरावा एकही हातात जर
फिर्याद मांडावी कशी कोर्टात मी

आटून गेली आसवे सारी जशी
होऊन पाणी वाहिलो पाटात मी

अभ्यासले कित्येक लोकांनी मला
आलो जरी नाही कुण्या पाठात मी 

बर्फाळ देहाने कुणी येऊ नका 
ज्वालामुखीच्या राहतो बेटात मी 

तेव्हाच हिर्वेगार झाले हे मळे
जेव्हा स्वतःला गाडले शेतात मी 
 
अंगावरी कुत्रा कुणी जर भुंकला
ठेऊन देतो लाथ पेकाटात मी
 
रात्री उपाशी झोपलो कित्येकदा
गेलो न कोणाच्या तरी दाठ्ठयात मी 

ज्यांना कधी चाले न माझे नावही
हल्ली तयांच्या राहतो ओठात मी 

नाही लढाई एकट्याची ही जरी
सामील व्हावे कोणत्या गोटात मी 

सांगा कुणी ह्या मूर्ख राशींना जरा
घालीत नाही अंगठी बोटात मी 

रोखेल माझी वाट आता जो कुणी
जाईन त्याला आडवा रस्त्यात मी 

आव्हान सामर्थ्यास माझ्या द्याल तर
आणीन सारे विश्व संपुष्टात मी 

उंची खुज्यांनी मोजली माझी कशी
झेपावतो जर नित्य आकाशात मी 
                       
२.
    
होतो नव्याने परिचय कधीकधी
याचेच वाटे मज भय कधीकधी 
 
आहे पहारा जर जागता इथे
होते कशाने हयगय कधीकधी 

ही ठेव माझी जपतेस तू जरी
माझा तुझ्याशी विनिमय कधीकधी 

रागात गेला जर तोल आपुला
नाचून घ्यावे थयथय कधीकधी 

अर्थात केव्हा समतोल साधण्या
शब्दात येते मग लय कधीकधी 

कुस्ती असावी बहुधा नुराच ती
होतो पराभूत विजय कधीकधी 

काढा निकाली खटले जमेल ते
होतो निवाडा जर तय कधीकधी 
 

३.

तुमच्याहुनी किती मी विरळा असे म्हणाला
मज काल एक ढोंगी बगळा असे म्हणाला

वरती चढून गेला अमुच्याच जो शिडीने
तुमच्यामधून आता वगळा असे म्हणाला

कडबा दिला अम्हा अन् कणसे घिऊन गेला
बघ मी हिशेब केला सगळा असे म्हणाला

इतक्यात वेसणीचा मज त्रास फार होतो
मज बैल एक वेडा ढवळा असे म्हणाला

बदचाल वाटलो मी बहुधा असेन त्याला
कमळेस एकदा तो कवळा असे म्हणाला 

तुमचे भले कराया घरदार सोडले मी 
पण रोज देशभक्ती चघळा असे म्हणाला 
 
४. 
 
सांगाया संपन्न जगी आहे ती
नात्यागोत्याची कणगी आहे ती

जेथे द्वेषाचा वणवा पेटावा
तेथे मायेशी सलगी आहे ती

सावित्रीची लेकच नाही केवळ 
तर जोतीबाची मुलगी आहे ती

राखेच्या गोळ्यासम तेव्हा होती 
आता आगीची ठिणगी आहे ती

सारे मागाहून तिच्या आलेले 
युद्धाआधीची हलगी आहे ती
                       
५.

खोल दरी अन् जंगल आहे 
आणि पुढ्यातच अस्वल आहे 

द्वेष, दगा, कपटीपण यांचा 
रोज मनावर अंमल आहे 

देश-विदेश असे कर काही 
ही तर क्षुल्लक दंगल आहे 

व्याप उगाचच वाढत गेला 
मी म्हटले तर सिंगल आहे 

ती अगदीच निरागस तैसी
अल्लड आणिक चंचल आहे

व्याज कधी बघ खंडत नाही 
कायम जोवर मुद्दल आहे 

भ्रष्ट इथून तिथून जगी ह्या
कोण पवित्र नि मंगल आहे 

भार शिरावर वाहत गेलो
त्याचमुळे तर टक्कल आहे 

हे तर निव्वळ मानवतेचे
घोर विडंबन, टिंगल आहे 

आपण सत्यच मांडत राहू
तो जर मारत बंडल आहे 

मोफत जे सगळ्यांस मिळाले 
ते चवदार हलाहल आहे 
......................................
 
सिद्धार्थ भगत

No comments:

Post a Comment