दोन गझला : शिवकवी - ईश्वर मते



१.

फक्त समजू नको पाहण्यासारखा
चेहरा वाच तू वाचण्यासारखा 

सूर्य नाही जरी मी जगावेगळा
दीप हृदयात मी लावण्यासारखा

मी कशाला तुला सांग बोलू नवस
देव नाहीस तू पावण्यासारखा

स्वार्थ साधावया देश विकतोस तर
द्रोह नाही तुझा झाकण्यासारखा

लोक आहेत इथले उपाशी तरी
वाटतो का विषय टाळण्यासारखा

२.

माय मुकली पाडसाला युद्धानंतर 
अवकळा आली घराला युद्धानंतर

जाळुनी सौभाग्य गेले बघता बघता
नववधूंचा घात झाला युद्धानंतर 

कोण मेले राजनेत्यांचे सीमेवर 
आमचा बाबा न आला युद्धानंतर 

हिटलराने घात केला तख्तासाठी
देश मग अश्रूत न्हाला युद्धानंतर 

जिंकलेले युद्ध हरला लंपट राजा
सैनिकावर आळ आला युद्धानंतर 

............................................
 
शिवकवी-ईश्वर मते,
पाटखेड,
अकोला,9405623594

1 comment: