१.
आठवण सारखी येत जावी तुझी
वाटते एकदा भेट व्हावी तुझी.
खूपदा वाटले आज बोलू चला
मी खुशाली विचारून घ्यावी तुझी
जन्मभर जी मला देत जाईल बळ
सोबतीला अशी गोष्ट न्यावी तुझी
एकदाही न केलीस तू चौकशी
फोन वां पत्रही ना निनावी तुझी
ये सखे एकदा घट्ट मारू.मिठी
वाट मी एवढी का पहावी तुझी
चल जगू ये पुन्हा एक तर आठवण
एक तर गोष्ट माझी रहावी तुझी
जोडणारी तुला अन मला पाहिजे
एक मैत्रीण ही ना दिसावी तुझी
२.
या सगळ्या सुंदर शब्दांना
देऊ आपण घर शब्दांना
वाढत जाते वय शब्दांचे
मिळतो मग आदर शब्दांना
शब्दांनी तर युद्धे घडली
गरजेने वापर शब्दांना
तळहातावर घे रंगांना
चिमटीमध्ये धर शब्दांना
आधी उघडे कर शब्दांना
मग पुन्हा पांघर शब्दांना
कातर होतो हात सखीचा
अन् सुटते कापर शब्दांना
मन शब्दांनी गंधित होते
असते का अत्तर शब्दांना
................................
मंगेश जनबंधू
👌🌹
ReplyDeleteसुंदर
आम्हा घरी धन