इस्लाह : संजय गोरडे




            विशेषतः गझल या काव्यप्रकारात शिकण्या शिकवण्यादरम्यानच्या प्रवासात 'इस्लाह' या शब्दाशी आपली गाठ पडते. साध्यासोप्या भाषेत 'इस्लाह' म्हणजे सुचवलेली दुरुस्ती. आपल्या जाणकार व हितचिंतक मार्गदर्शकाकडून आपल्या खयालात आपल्याकडून राहून गेलेल्या त्रृटीबाबत सुचवलेले (पर्यायी) corrections.

        सुरूवातीच्या काळात आपल्या रचनेच्या निर्मितीप्रक्रियेत आपण समरस झालेलो असताना आपल्या विचारांच्या मांडणीतील काही सूक्ष्म दोष सहसा आपल्या लक्षात येत नाहीत, पण त्रयस्थ जाणत्या डोळ्यांना हा दोष प्रथमदर्शनीच जाणवतो. नुसता जाणवतच नाही तर त्यांच्याकडे तितक्याच त्वरेने त्याचा reform सुद्धा तयार असतो. त्यालाच इस्लाह असे म्हणतात! असे असले तरी 'इस्लाह' करणाऱ्याने तुमच्या खयालाला धक्का लावणे अपेक्षित नसते. इस्लाह म्हणजे पूर्णच्या पूर्ण शब्दकळा बदलणे नव्हे! 'इस्लाह' ही सूक्ष्म परंतु परिणामकारक अशी दुरूस्ती असते, जी शेराला मुकम्मल होण्यास मदत करते. इस्लाह म्हणजे केवळ तंत्राचा सांगाडा तपासणे नव्हे! ती तर नुसती लकीर की फकीरी ठरेल! खरेतर त्यासाठी जाणकाराची गरजच लागूच नये. 
            वृत्त-व्याकरणातील, लयछंदातील, किंवा खयालाच्या मांडणीतल्या तारतम्याबाबतची ज्याची त्याची अंगभूत 'तयारी' वेगवेगळी असते. अनेक ठिकाणी सुधारणेला वाव असतो. अशावेळी आपली रचना जास्तीत जास्त निर्दोष व्हावी या सात्विक हेतूने आपल्याला सुचवले गेलेले संशोधन किंवा बदल म्हणजे इस्लाह! तंत्र आणि मंत्र या दोन्ही स्वरूपाची आपल्यापेक्षा अधिक जाण व योग्यता असलेल्या मार्गदर्शकाकडून आपली गझल रचना  तपासून घेण्याची ही एक परंपरा आहे. इस्लाहबाबत आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. इस्लाह स्वीकारायला खरेतर काही हरकत नसायला हवी. पण मराठी काव्यप्रांतात अनेकांना असा इस्लाह 'जसाच्या तसा' स्वीकारायला जड जातो, अवघड जातो! यात अनेकदा आपल्याच काही धारणा आडव्या येतात. या धारणा व्यक्तीनिहाय वेगवेगळ्या असू शकतात. पण आडव्या येतात खऱ्या! 
            आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल मिडियासारख्या माध्यमांच्या काळात, व्यक्त होण्याची बेसुमार चढाओढ लागलेली असतांना चार ओळी धड लिहिता येत नसल्या तरी गुडघ्याला बाशिंग बांधलेला एखादा कवी आपला शब्द वज्रलेख समजू शकतो. आपली शब्दयोजना कुणाच्या तरी सूचनेमुळे बदल करणे त्याला उसनवारी किंवा अपमानजनक वाटू शकते. याचा अर्थ इस्लाह बाबत मुळात आपल्या मनातच संभ्रम आहे! इस्लाहची मूळ परंपरा काय आहे हे न समजून घेताच इस्लाह दिला व घेतला जात असल्याने या गोष्टी घडताहेत. पूर्वी मोठ्या मुश्किलीने एखाद-दुसरा उस्ताद मिळायचा. त्यामुळे गुरूशिष्यांच्या नात्यात प्रेम विश्वास आणि आदर होता. इस्लाहसाठी गुरूशिष्याच्या नात्यात सौख्य व आत्मीयता अपेक्षित आहे. तसा अलिखित का होईना पण एक करार या देवाणघेवाणीत आहे. त्याचेच प्रतिक म्हणून पूर्वी शागीर्द लोक आपल्या उस्तादांकडून गंडा बांधून घेत असत, त्यांची मर्जी संपादन करण्याकरता वर्षवर्ष त्यांच्या मागे फिरत असत. त्याची शिकण्याची तळमळ, मेहनतीची तयारी, व ज्ञानाची भूक पाहूनच उस्ताद त्याच्यासाठी आपली ज्ञानाची पोतडी खोलत असे. शिष्याच्या प्रश्नातही जिज्ञासा होती... त्यांची ऐकण्याची मानसिकता होती. 'संवादातून शंका निरसन' ही शिकण्याची पद्धत होती... त्यासाठी वर्षानुवर्षे त्याच्यामागेपुढे फिरण्याची शिष्यांची तयारी होती. मुळात एकमेकांशी ओळख असल्याशिवाय, परस्परसंबंधात प्रेम, अधिकारासोबत श्रद्धा व समर्पण असल्याशिवाय ही विचारांची  देवाणघेवाण शक्यच नाही. 
                    आपले प्राथमिक व ढोबळ खयाल शागीर्द आपल्या उस्तादांकडून 'इस्लाह' करून घेत असत! अश्याप्रकारे गुरूशी होणाऱ्या निरंतर चर्चेतून गझलेविषयक जाणीव समृद्ध होत असे. त्यांनी प्रमाणित केल्यानंतर, त्यांच्या परवानगीनेच मुशायऱ्यात गझल सादर करण्यात येत असे. असे न करणे उस्तादचा उपमर्द समजला जाई. गुरूशिष्याचे हे नाते कायमच अदबीचे असे. गुरू कधीही शिष्याच्या कोणत्याही रचनेची समीक्षा तसेच परिष्करण करून त्याला इस्लाह देऊ शकत असे. आणि असा इस्लाह तर्कसंगत असेल तर कुठलाही आडपडदा न ठेवता, युक्तिवाद न करता, शागीर्द तो इस्लाह स्वीकारीत असे. तेव्हाचा काळ पाहता आजुबाजूला अशी गुरूतुल्य माणसं अगदी मोचकीच असल्याने त्यांच्यात अवरोध वा विसंवाद होण्याच्या शक्यता फारच कमी असत. आणि झाला तरीही दुसर्‍या उस्तादाकडेही याच परंपरेने शिकणे भाग होते.
                        आज सोशल मिडियावर विविध ऑनलाइन कार्यशाळा होताहेत. त्यातून असंख्य हात लिहिते होताहेत. अर्थात हे सगळं चांगलंच आहे. पण पूर्वीसारखं मायेनं हक्कानं इथे समजावता येणं शक्य नाही. कसल्याशा स्वार्थासाठी जमवलेला हा सगळा गोतावळा आहे. इथे माणसं भुलवली, वापरली जाताहेत. माध्यमांनी आपण केवळ व्हर्च्युअली जोडले गेलेलो आहोत. लोकांना एकमेकांपर्यंत सहज पोचता येतंय. प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांकडून शिकता येतंय. पण शेवटी या सगळ्याला मर्यादा आहेत.  हे प्रचंड किचकट काम आहे. या रूक्षतेत तंत्राचे सांगाडे शिकवले जातीलही पण मनोमिलनाशिवाय मंत्राची दीक्षा नाहीच दिली जाऊ शकत! म्हणूनच खरी गरज आहे ती एकमेकांशी मनाने जोडले जाण्याची! प्रत्यक्ष संपर्कातून, सहवासातून शिकणं हे कायम अधिक समृद्ध करणारं होतं आणि कायमच असणार आहे. इथे कुणी तुम्हाला सहन करणार नाही. कारण इथे कुणी कुणाला शिरोधार्य मानतच नाहीत. त्यामुळे कवितेच्या, गझलेच्या दर्जाबाबत, दुरूस्त्यांबाबत ज्यांच्याशी आपलं सौख्य आहे अशा काही मोजक्या लोकांशीच खासगीत संपर्कात राहून शिकणंच इष्ट! 

                एक इष्टमित्र म्हणून इतकाच निष्कर्ष लक्षात घ्या की एकतर, 'मी कधीच कुणाचा इस्लाह स्वीकारणार नाही' अशी पूर्वप्रतिज्ञा कधीच करू नका; आणि अतिशय सुंदर व चपखल इस्लाह मिळाल्यास तो स्वीकारण्यात कधी संकोचही करू नका मित्रहो... ही गझलेतील एक अदबशील परंपरा आहे, जी मनामनाला जोडत जाते... व उत्तरोत्तर आपली गझल समृद्ध होण्यास मदतगार होते. त्याहून वेगळ्या शक्यता तपासत बसणे गैर नाही परंतु यात आपली गझल व आपण, दोघेही खुजे राहून जात असेल तर काय उपयोग? यामुळे एकतर 'इस्लाह' नीट समजून घ्यायला हवा आणि दुसरे म्हणजे परस्परसंबंधात आत्मीयता हवी! गझल हा आपल्या प्रज्ञेच्या प्रवृत्तीचा, अभिरुचीचा, आकलनाचा... तितकाच सरावाचा विषय आहे! आणि 'इस्लाह' हा या परिपक्वतेच्या प्रवासात आपला महत्वाचा मदतगार आहे. त्यासाठी एकमेकांप्रती आत्मीयता, विश्वास, सकारात्मकता व स्वीकार असावा लागतो. या सगळ्याच गोष्टी तोलामोलाने जुळून आल्या तर आपण आपल्या सृजनप्रवासात उत्तरोत्तर परिपक्व होत जातो! जसे एखाद्या सॉफ्टवेअर किंवा ऍपलिकेशन मधे त्याच्या अनेकदा वापरानंतर लोकांकडून काही त्रृटी, तक्रारी, आक्षेप, अपेक्षा, पर्याय किंवा सूचना येत असतात. त्यानंतर त्यांच्यावर सकारात्मकपणे काम करून त्या ऍपलिकेशनमधे अनेक सुधारणा करून ते जास्तीत जास्त निर्दोष केले जाते. सृजन हा सुद्धा तसाच परिपूर्णतेकडे कायम सुरूच असलेला एक प्रवास असतो! यात सातत्याने सुधारणा शक्य असते. 
                    एखादा खयाल मनासारखा (चपखल/मुकम्मल) होण्यासाठी आपणच त्याच्या अनेक शक्यता पडताळायला हव्यात. त्यासाठी आपली नियत, कुवत व सहनशीलता यांचा कस लागतो. सोबतच उत्तमतेचा, अचूकतेचा, नेमकेपणाचा नैसर्गिक ध्यास असावा लागतो. हल्ली सोशल मीडियावर एखाद्याचा लेखन प्रवास आपण कित्येक दिवस बघत असतो. त्यातून त्याच्या लेखनाचा परीघ, विशिष्ट आवाका इत्यादीचा एक पॅटर्न आपल्याला दिसायला लागतो. तेव्हा ओळीओळीतून स्वत:च्या गझल जाणिवेला अपडेट करण्याची प्रत्येकाला संधी आणि गती मिळत असते. काहींचे अगदी त्याविरूद्ध असते. त्यांना कायम छोट्याछोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर विसंबून रहायचे असते. अशावेळी कुणाला काय व किती सांगायचे, आणि कितीवेळा सांगायचे? मुख्य म्हणजे कुणी सांगायचे!? 

                चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या एखाद्या उमेदवाराला विचारल्यानंतर किंवा स्वयंस्फूर्तपणे जाणकारांनी काही दुरुस्त्या सांगाव्यात की नको हा ही एक प्रश्नच आहे, कारण अनेकदा आलेल्या नकारात्मक अनुभवांमुळे जाणकार आपल्या चुकांवर मौन बाळगून असतात. 

कुछ लोग कई लफ़्ज गलत बोल रहे है 
इस्लाह मगर हम भी अब इस्लाह ना करेंगे 

गुस्सा है तहज़ीब-ए-ताल्लुक़ का तलबगार 
हम चुप है बाहर बैठे है गुस्सा ना करेंगे

                        असे जॉन एलियासारखा लिजेंड शायर म्हणतो तर हा आत्मचिंतनाचा विषय आहे.  अनेकदा असेही होते की जाणकारांना सुखवणारी वागणूक देणारे काही अनेक शागीर्द असतात. त्यांच्यात क्षमता असेल तर ते जाणकारांकडून त्यात्या विधेचे गुह्य समजून घेतात! ते असं करू शकतात कारण त्यांच्यात ती प्रतिभेची क्षमता असते. अशी क्षमता कमी असलेले अनेकजण आपल्या उस्तादांना आपल्या चांगल्या स्वभावाने आपलेसे करतात खरे, मात्र प्रतिभेच्या अभावाने ते दुभत्या गायीजवळ राहूनही कुपोषित राहतात. आडातच नसेल तर पोहऱ्यात येईल कसे? कारण शेवटी या साऱ्या अंगभूत योग्यतेच्या गोष्टी आहेत. 
                    अनेकदा चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना अनेक दिलदार व जेष्ठ जाणकार स्वत:हून औदार्य दाखवत काही दुरुस्ती सुचवतात तेव्हा त्यांचा त्यांचा रिस्पेक्ट करायला हवा! मतभेद असले तरी आपल्या प्रतिसादातून तो दिसायला नको. कारण इस्लाह मिळणे इतकेही सहजसुगम नाही. अनेक जाणते दुसऱ्यांच्या रचनेत इस्लाह करण्यास अनुत्सुक असतात.
                    आणखी एक निरिक्षण म्हणजे एखाद्याने त्याच्या रचनेत सुधारणा सुचवणाऱ्यांच्या सगळ्याच सुधारणा सतत व सर्रास स्वीकारणे हेही बरोबर नाही. खरेतर सुधारणा होणे म्हणजे चूकांची पुनरावृत्ती कमी होणे असते. दरवेळी त्याने त्रृटी ठेवाव्यात व कुणीतरी त्या दुरुस्त कराव्यात हे अतिशय निराशजनक आहे. अशा सातत्याने एखाद्याच्या दुरुस्त्या करत बसायला कुणाला आवडेल? जाणकारांना हे असे अनेक अनुभव आमच्यासारख्या नवशिक्यांकडून येत असतात ज्यात विनय, जिज्ञासा, प्रामाणिकता, अभ्यास व कष्टाळुपणा याऐवजी उथळता, उत्साहाचेच प्रमाण अधिक असते!
                हल्ली 'अनावश्यक व अप्रत्यक्ष इस्लाह' देण्याची एक नवीनच वर्चस्ववादी पद्धत रूढ होऊ पाहत आहे. पूर्वपरिचयाशिवाय आणि विचारल्याशिवाय कुणालाही अशा प्रकारच्या सूचना करणे कदाचित नकळतही घडत असेल पण हे थोडे वादग्रस्त ठरणारे आहे! "तुमची ही ओळ मी असा बदल करून वाचली" अशा प्रकारची तद्दन उपरोधिक टिप्पणी करून यातून समोरच्याचे व स्वत:चे हसे करून घेण्याचा हास्यास्पद प्रकार होतो. हा 'अप्रत्यक्ष इस्लाह' एकमेकांबद्दलच्या आत्मीयतेशिवाय स्वागतार्ह नाही. याशिवाय काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले जाणकारही असतातच, ज्यांना स्वत:च काही कळत नसतांना इस्लाहच्या भानगडीत पडतात... असो. म्हणून आपल्याला इस्लाह सुचविणाऱ्यांची आपल्यापुरती अशी मर्यादित यादी असायला हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शक्य असेल तर आपण आपली रचना प्रथम मार्गदर्शक व्यक्तीच्या नजरेखालून घालावी. त्यांच्या समाधानानंतरच ती सोशल मिडिया किंवा मुशायऱ्यात सादर करावी. पुस्तकात छापताना याहूनही अधिक सजग असणे गरजेचे. त्यानंतर इस्लाह करून काय उपयोग? अर्थात तेव्हाही हरकत नसतेच पण उशीर होतो. कारण फर्स्ट इम्प्रेशन हेच शेवटी महत्वाचं असतं!  
                प्रयत्नाला, शिकायला व समजून घ्यायला कुणाचीच हरकत असू शकत नाही, पण 'मीच, गझलच, लिहीणारच' हे चकार खूप खतरनाक आहेत यातला कोणत्याही चकाराचा अट्टाहास नको! हा गझलेचा नाद काही तितकाही चांगला नाही. यात एक चांगला कवी बरबाद होऊ शकतो. गझल हीच जर का तुमची वृत्ती-प्रवृत्ती असेल तर नक्की ती तुम्हाला स्वत:च वरमाला घालेल. ही सगळी चर्चा ज्याचा खयाल ज्याला जसा ठेवायचाय तसा ठेवण्याचा त्याचा हक्क अबाधित राखून... 
 
- संजय गोरडे,
नाशिक


3 comments:

  1. अभ्यासपूर्ण लेख! अभिनंदन 💐💐 आणि मनःपूर्वक धन्यवाद.🙏

    ReplyDelete
  2. लेख अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक आहे

    देखें रोगातें जिणावें । औषध तरी द्यावें ।
    परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥

    ज्ञानेश्वरी

    ReplyDelete
  3. अतिशय मौलिक मांडणी केली संजूभाई... 💛💚💙❤

    ReplyDelete