तीन गझला : केदार पाटणकर

 

१.
पापणी अद्याप माझी मिटत नाही
जीवनाचा मोह काही सुटत नाही

श्रावणातच पाहुनी घ्यावे धरेला
एरवी इतकी कधी ती नटत नाही

बोलणे माझे जगाला कळत नाही
सांगणे मजला जगाचे पटत नाही

सर्व देणी फेडता येतात येथे
कर्ज मायेचे कधीही फिटत नाही

 २.
हे तेच ते दिनरात...मी वैतागलो
नाही बदल अजिबात ...मी वैतागलो
 
जी पाहिजे ती चीज नाही गवसली
हिंडून बाजारात मी वैतागलो
 
ती मीलने, ती चुंबने, आलिंगने
सारेच हे स्वप्नात !...(मी वैतागलो)
 
घे आत किंवा सुचव ना जाण्यास तू
थांबू किती दारात ? मी वैतागलो
 
किटकीट पत्नीची नि पोरांचे रडे --
-- माझ्याच संसारात मी वैतागलो !
 
 
३.
नाव तुझे मी ह्दयावरती लिहिले होते.
लिहिले होते म्हणून जीवन तरले होते

नकोच होते जे जे, त्याची यादी केली
आयुष्याचे गोंधळ सगळे मिटले होते

तुझी हजारो वचने गेली विरून जेथे 
शब्द मोजके माझे तेथे तरले होते  

त्या स्नेहाच्या धाग्यांना  पोलाद म्हणू या 
आघातांच्या नंतरही ते टिकले होते

तुझ्या घराचा पत्ता कळला ज्या गाडीला  
त्या गाडीचे टायर तिकडे वळले होते
....................................
 
 केदार पाटणकर

2 comments:

  1. मी वैतागलो 🙃

    तुझ्या घराचा पत्ता कळला जा गाडीला 👌🌹

    ReplyDelete
  2. तीनही गझला सुदंर👌👌

    ReplyDelete