दोन गझला : जीवन धेंडे


 
१. 

हात वा-याचा जरासा सोडतो आहे.
मी प्रवाहाच्या विरोधी वाहतो आहे.

मी कुण्या ताटातले हिस्कावतो कोठे,
फक्त हक्काचेच माझ्या मागतो आहे.

गाजल्या त्या मैफिली माझ्याविना आता
मीच माझा एकटा झंकारतो आहे.

आग ती लावेल या देहास कायमची,
भेटणे म्हणुनी विजेला टाळतो आहे.

ही पिढी जगवायची आहे पुढे म्हणुनी,
मी हजारो आज झाडे लावतो आहे.

कोणत्या ठेवू अपेक्षा कायद्याकडुनी,
कायदा पैशापुढे जर लोळतो आहे.

फूल माझ्या एक हृदयी उमलते म्हणुनी, 
अंतरंगी सारखा गंधाळतो आहे.

२.

द्या जरा झोका कुणी झोक्यास माझ्या.
दुःख आहे लटकले झाडास माझ्या.

तू हवे तर दे पुन्हा अग्नी मला पण,
आग कोठे जाळते आत्म्यास माझ्या.

मी सुदाम्याचेच पोहे देत आलो, 
मी दिले काही कुठे कृष्णास माझ्या? 

गोड ओठाने मला चुंबून गेली, 
लागल्या मुंग्या पुन्हा ओठास माझ्या.

वार नजरेचा तिचा होता तरी पण, 
जाहली कायम जखम ह्रदयास माझ्या, 

मी स्वता:ला टाळले आयुष्यभर अन्,
मीच आलो शेवटी कामास माझ्या.

वाढते किंमत इथे तर सोबतीने, 
घ्या तुम्ही मग सोबती शुन्यास माझ्या.
.......................................
 
जीवन धेंडे(कासारी)
बार्शी(सोलापूर) 
8007837652

6 comments:

  1. खूप छान दोघही गझल रचना

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद मँम🙏🙏🙏

      Delete
    2. मनापासून धन्यवाद मँम🙏🙏🙏

      Delete
  2. मनापासून धन्यवाद मँम������

    ReplyDelete
  3. मनापासून धन्यवाद गुरू

    ReplyDelete